अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता निरोप घ्यावा आता येतो आंम्ही .🙏🏻
सर्वे$पि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया:।
सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्।।
या वेदमंत्राप्रमाणे ज्यांनी प्रत्येक व्यक्ती सुखी असावी, निरामय असावी त्याचे जीवन मंगलमय असावे, कोणत्याही प्रकारचं दुःख कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात नसावे याच ध्येयाने माणसे जोपासली असं व्यक्तीमत्व म्हणजे श्रध्येय सुधाकरपंत परिचारक .
पंढरपूर म्हणलं की जितका पांडुरंग तन्मयतेने आठवतो तितक्याच आर्ततेने प्रत्येक व्यक्तीच्या मनातून साद येते ती म्हणजे माणसातले देव म्हणून गणले जाणारे आमचे "मोठे मालक".
प्रत्येक वंचित,उपेक्षित, अपेक्षित, शेतकरी वर्गाचे पालन पोषण करीत पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती व मोठे मालक यांच्यात एक नातं निर्माण झालं होतं, आणि याच नात्यातून जनभावनेतून त्यांना जनतेने एक उपाधी बहाल केली ती म्हणजे "श्रीमंत".
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये त्यांच्या सहज व भावणाऱ्या देहबोलीवरून त्यांची 'पंढरीचा पांडुरंग' म्हणून आदरयुक्त ओळख निर्माण झालेली होती. अगदी सामान्य राहणीत रमणारे प्रत्येक व्यक्तीला आपलेसे वाटणारे व आपलेसे करून घेणारे असे श्रद्धेय मोठे मालक होते. लोकमताचा आदर करून लोकांना आवश्यक वेळोवेळी सहकार्य करणारे आणि संकटातील व्यक्तीला लीलया बाहेर काढणारे असे जनतेचे तारणहार "श्रीमंत" होते, याच जनतेच्या प्रेमातून त्यांनी २५ वर्षे पंढरपूर तालुक्याचे नेतृत्व केले.
जो मालकांच्या सहवासात आला तो कायमच मालकांचा प्रेमी झाला असा पंढरपूर तालुक्याचा इतिहास सांगतो. असे हे एक राजकारण. समाजकारणातील एक आगळे-वेगळे व्यक्तिमत्व म्हणूनच ओळखले जाणारे श्रद्धेय सुधाकरपंत यांना राजकारणातील संत असे संबोधले जायचे.मोठे मालक ज्या संस्थांमध्ये राहिले व तेथील कारभार पहिला त्या प्रत्येक संस्थेचा उद्धार श्रीमंतांच्या प्रशासनातून झाला हे ही पंढरपूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. राज्य परिवहन महामंडळ चे अध्यक्ष झाले तेव्हा तोट्यात असणारे महामंडळ नफ्यात आणायचे काम केले. भीमा सहकारी कारखान्याच्या पुनरुज्जीवन देण्याचे कार्य ही श्रीमंतांनीच केले . DCC बँकेचा लौकिक वाढविला. या सर्व संस्था वाढविताना सर्व सामान्य जनता, शेतकरी वर्ग यांचा विकास साधत हे कार्य त्यांनी केले व या संस्था मोठ्या झाल्याचा फायदा या सर्वसामान्य गोर गरीब शेतकरी सभासदास होत होता. या कार्यशैलीतून त्यांना पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते असेही संबोधित केले जायचे.
"अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता
निरोप घ्यावा आता येतो आम्ही"
अशीच काहीशी प्रचिती श्रीमंतांनी दिली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना देखील माझ्या शेतकरी राजाचा सण (बैल पोळा) हा मोठ्या दिमाखात साजरा व्हावा हा विचार करून ते चेअरमन असणाऱ्या पांडुरंग सहकारी कारखान्याच्या सभासदांना २०० रुपये उसबीलापोटी हफ्ता जाहीर केला. गोर-गरिबांना आधार दिला आणि त्याच सणाच्या आदल्या रात्री शेतकऱ्यांचे कैवारी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी जगाचा निरोप घेतला ही सदैव समरणात रहाणारी घटना आहे.
अशा या निष्काम कर्मयोगी , सहकारातील डॉक्टर, पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते, श्रीमंत श्रद्धेय स्व. सुधाकरपंत परिचारक यांना प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏
©दिपस्तंभ.
Comments
Post a Comment